जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक संस्कृती जन्माला आल्या. प्रत्येक संस्कृतीने आपापली जिवनपद्धती विकसीत केली आणि त्यानुसार एक स्थिर समाजव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या समाजव्यवस्था प्रचंड विविधतेने नटलेल्या आहेत. यातील चाली रिती, व्यवसायाच्या, खान्यापिन्याच्या, वस्त्र परिधानाच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात तर प्रत्येक पाउलावर याचा प्रत्यय येत असतो. कित्येक धर्म, जाती, भाषा, जिवनशैली, उपासना पद्धती यांनी हा समाज विविध रंगांनी बनलेल्या इंद्रधनुष्यासारखा भासतो. हे वाचताना जितके छान आणि मोहक वाटते तितकेच ते प्रत्यक्षात पाहताना जाणिवांच्या कक्षा अधिक रूंदावणारे असते हे खरे. रूढी परंपरेतील चाली ज्याप्रमाणे वेगळ्या असतात त्याचप्रमाणे त्या प्रत्येक वेगळेपणाच्या मागचा कार्यकारणभाव हासुद्धा वेगळा असतो. तो तसा असण्याच्या मागे अनेक, ऐतिहासीक, सामाजिक, सांस्कृतीक इतकेच नव्हे तर आर्थिक पार्श्वभूमी असते. याचाच अनुभव मी नडगेपाडा नावाच्या एका आदिवासी पाड्यातील लग्नसोहळ्यात घेतला.
मी काम करत असलेले गाव म्हणजेच चांभारशेत. हे एक आदिवासी बहुसंख्य असलेले गाव आहे. लहान मोठ्या अशा एकूण बारा पाड्यांनी बनलेले हे गाव आहे. काही पाड्यांपर्यंत रस्ता जातो, गाडी जाते परंतू स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनतरही काही वस्त्या- पाडे असे आहेत की जेथे वाहने जात नाहीत. किमान अर्धा तास तरी डोंगर चढून चालत जावे लागते. कित्येक काळापासून खोल जंगलांमध्ये घर करून राहिलेल्या या लोकांची आपली म्हणून एक जिवनपद्धती आहे. त्यामागे त्यांचा असा स्वतंत्र विचार आहे. ज्यातून माझ्यासारख्या कथित (सो कॉल्ड) विकसीत किंवा विकसनशील भागातून आलेल्या एका तरूणाला खूप काही शिकण्यासारखे आहे.
असाच एक पाडा म्हणजे नडगे पाडा. या पाड्याला असे नाव पडण्याचे कारण म्हणजे या पाड्यात नडगे आडनावाचे लोक जास्ती संख्येने राहतात. आदिवासींमध्ये सुध्दा अनेक जाती जमाती आहेत. विशेष बाब म्हणजे या जमातींमध्ये रोटी बेटी व्यवहार चालतो. त्यामुळे एकच आडनाव वेगळ्या जमातीत असू शकते. परंतू, नडगे हे आडनाव बहुदा वारली समाजात पाहायला मिळते. या पाड्यामधील बचत गटांच्या महिलांसोबत बैठक घेत असताना आम्ही ज्या महिलेच्या अंगणात बसलो होतो त्या महिलेने आतमधून एक पत्रिका आणली. ती पत्रिका तिच्या मुलाच्या लग्नाची होती. अतिशय साधी पत्रिका, रंगीतच पण अतिशय पातळ कागदावर ती छापलेली होती. त्यांनी ती मला दिली आणि म्हणाल्या “सर, नक्की या बरं का. आमच्याकडलं लग्न कसं असतं ते बघायला मिळेल तुम्हाला.” मी ज्यांच्यासोबत काम करत होतो त्यांच्या कडून एखाद्या मंगल कार्यक्रमाचं मला मिळालेलं हे पहिलंच आमंत्रण होतं. त्यामुळे मी ही खुष होतो. मी पण मस्त त्या पत्रिका देतानाचा फोटो काढून घेतला. त्याच बैठकीत मला असं समजलं की, लग्नासाठी त्या ताईंनी त्यांच्या बचतगटामार्फत महासंघातून २० हजार रूपयांचं कर्ज घेतलं होतं. आणि मागील वर्षात रोजाने काम करून कमवलेल्या पैशांवर त्या मुलाच्या लग्नाचा थाट करत होत्या. त्यावेळी निव्वळ मानपानासाठी लाखो रूपये खर्च करून राजेशाही थाटात पार पडणाऱ्या आमच्या गावाकडील लग्नांचं चित्र डोळ्यांसमोर येऊन गेलं. नंतर सहज बोलताना मी त्यांना विचारलं की तुमच्या मुलाचं वय किती? त्यावर त्या म्हणाल्या वीस. मग मी विचारलं मग मुलगी पण लहानच असेल तर त्या म्हणाल्या हो दोन वर्षांनी. त्यांच्या शिक्षणाविषयी विचारल्यास म्हणाल्या की मुलगा १२ वी शिकलाय आणि आता आमच्याबरोबरच रोजाने कामावर येतो. आणि मुलगीही १० वी शिकली आहे. तेव्हा जे लग्न पाहायला मी खूष होत होतो त्यामागची सामाजिक परिस्थिती माझ्यासमोर होती. जी अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी आहे.

लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजेच हळदीच्या दिवशी खरी धमाल असते. त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशीच या असं मला त्यांनी सांगीतलं होतं. मग काय मिही मस्त मुक्कामाच्या तय्यारीने पोचलो. त्यांच्या घरापर्यंत जाउस्तोवर काय कार्यक्रम असल्यासारखे वाटेना. त्याच्या दारात गेल्यावर एक छोटंसं मंचक (स्टेज) तयार केलं असल्याचं दिसलं. त्याला छान रंगीत पडदे लावून सजवलं होतं. त्याच्या मागे एक माणूस दोन मोठ्या ध्वनीक्षेपकांची (साऊंड) जोडणी करत होता. त्याला विचारल्यास कळालं की त्या मंचकावर तिथल्या गावातील काही मुलं बँडवर गाणी वाजवतील आणि रात्रभर सर्व गावकरी, महिला, पुरूष, लहान-थोर, पोरं-पोरी मनसोक्त नाचतील आणि नवरदेवालाही नाचवतील. हे माझ्यासाठीही काहीतरी नवीन होतं. मग मी त्यांच्या घरात गेलो, काकांनी मला बसायला खुर्ची दिली आणि लगेच एक प्लास्टिकचा ग्लास आणि एक थम्स अप ची बाटली घेऊन आले. घरी आलेल्यांना थम्स अप पाजण्याची आणि त्यांच्या सोबत स्वतःही त्याचा आनंद घेण्याची प्रथाच आहे जणू. ते घर मातीचे होते. स्वतःच मेहेनत करून पाडलेल्या विटा आणि मातीचा वापर करून ते घर नुकतेच लग्नासाठी बांधले होते. आम्ही लहानपणी १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवरीला पताके लावून वर्गाची सजावट करायचो तशी सजावट त्यांनी लग्नासाठी केली होती. कागदाचे पताके लावून; ना फुलांच्या माळा, ना कसली तोरणं. नंतर त्यामागचं आर्थिक कारण कळालं की पताके कमी पैशात जास्त येतात त्यामुळे ते फायदेशीर ठरतं. बाकी हळदीचा कार्यक्रम जसा प्रचलीत आहे तसाच पार पडला फक्त मुलगा मुलाच्या तर मुलगी मुलीच्या गावाला असते. त्यानंतर, सर्वांची जेवणासाठी झुंबड उडाली, कारण लगिनघरात छान बिर्याणीच्या जेवणाचा बेत असतो. आणि त्याचा आस्वाद घ्यायला सर्व गावकरी आमंत्रित असतात. यामागचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे या जेवणासोबत मदिरा म्हणजेच दारूचीही व्यवस्था असते. यामध्ये जास्त करून गावठी महुआची, काजूची दारू आणि ताडी असते. परंतू आता हळुहळु देशी व इतर ब्रँड्सही लग्नात येऊ लागले आहेत असं कळालं. विशेष म्हणजे ही दारू ज्याला इच्छा असेल तो पिऊ शकतो. त्यात कोणत्याही प्रकारे जात, धर्म, लींग, रंग अशा कारणांवरून भेद केला जात नाही. किंवा पिणाऱ्यास नैतिकतेच्या तराजूतही तोलले जात नाही. त्या अर्थाने हा समाज काही व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत मुलतः पुरोगामी असल्याचे जाणवते.
त्यानंतर त्या ध्वनिक्षेपकांवर वाजणाऱ्या आदिवासी भाषांमधल्या आणि तारपा व ढोल अशा धाटणीच्या गाण्यांवर लोक खरचंच रात्रभर नाचत होते. त्यात मिही आपले चारपाच ठुमक्यांचे योगदान दिलेच. दुसऱ्या दिवशी मुलाकडचे काहीजण मुलीस आणायला तिच्या गावी जातात. जर लग्न मुलीकडे असेल तर नवरदेवाला घेऊन जातात. नाहीतर मुलीला घेऊन येतात आणि इकडेच लग्न लावतात. मुलीला घेऊन येण्याची ही पद्धत मला आवडली. लग्न लावताना मात्र कसलाच होम हवन, सात फेरे, कानपिळी, इवाई भेट, देवक पूजा अशा कसल्याच पूजा मला पहायला मिळाल्या नाहीत. लग्नाआधी केवळ कुलदेवतांचा आशिर्वाद म्हणून भगत कुंकू, तांदूळ चढवून कुलदेव, निसर्गदेव आणि गावदेवाकडे नवीन नवरानवरीसाठी आशिर्वाद मागतात. मात्र नवरानवरीमध्ये अंतरपाठ धरून ज्या ध्वनिक्षेपकांवर रात्री गाणी वाजवली त्यावरच मंगल अष्टिका वाजवल्या जातात अक्षता म्हणून तांदूळ फेकले जातात. आणि लग्न लागते. नंतर काही तरूण शिकलेल्या मुलांमध्ये उभारल्यास मला हे ही कळाले की हे मंगलाष्टीका वगैरे प्रकार आता सांस्कृतीक प्रमाणिकरणामुळे (Cultural standardization) आला आहे. नाहीतर जून्या लोकांना असलं काहीही माहिती नव्हतं.

हे झाले एक लग्न. त्यानंतर आणखीन एक अनोखे लग्न पाहण्याचा योग मला मिळाला. या लग्नामध्ये वर-वधुसह त्यांचे साधारण दोन वर्षांचे मुलही उपस्थित होते. याचे कारण विचारल्यास कळाले की मुलं मुली वयात आले की एकमेकांना पसंत करतात. त्यांच्यात लग्नाआधिच लैंगीक संबंध होउन मुलही जन्माला येते. परंतु, घरची आर्थिक परिस्थिती नसल्याने जेव्हा पैसे येतील तेव्हा समाजाच्या साक्षीने त्यांचे लग्नकार्य पार पाडले जाते. तोपर्यंत त्या मुलीचा सांभाळ सासरी अगदी विवाहीत सूनेसारखा होतो. ही ऐकताना जरी वैचारिक प्रगल्भता वाटत असली तरिही त्यामागील हालाखीच्या आर्थिक परिस्थितीचे विदारक दृष्य नजरेआड करता येत नाही. या समाजात प्रेमप्रसंगातून होणाऱ्या लग्नाला मान्यता आहे. वेगवेगळ्या जमातीत रोटी-बेटी व्यवहार चालतो, वयात आल्यानंतर मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत करतात आणि एकत्र राहू लागतात पण मध्येच अर्ध्यावर टाकून जात नाहीत. शेवटपर्यंत निभावतात. या समाजात हुंडा दिला किंवा घेतला जात नाही. कदाचित तितका पैसा नसल्याने असेल पण ही एक चांगली बाब आहे. अशा काही गोष्टी या समाजाकडे, वैचारीक दृष्ट्या पुढारलेला, मुक्त विचारांचा, प्रगल्भ म्हणुन पाहायला लावतात हे नक्की.
थोडक्यात हे पाहिलेले लग्न माझ्यासाठी केवळ सांस्कृतिक समारंभ नसून त्या समाजाचे वैचारिक आणि मानसिक व्यक्तित्व जाणून घेण्याची संधी होती. तो समाज संस्कृती म्हणून कोणत्या चाली रिती पुढे चालवतो आहे? त्या चाली-रितींमागचा त्याचा आपला असा काही विचार आहे काय? लग्नाआधी जेव्हा हे हिरवादेव म्हणजेच निसर्गदेवता, कनसरी म्हणजे धान्य, वाघोबा म्हणजे वन्यजीव यांची पूजा करतात तेव्हा या आदिवासी समाजाचं निसर्गाशी असलेलं नातं प्रकर्षाने जाणवतं. रात्रभर नाचणे, खानपानाच्या पध्दती यातून त्यांच्या आनंद साजरा करण्याच्या पध्दती कळतात. घर सजवायला पताके वापरने, लग्नाच्या दिवशीही वरमाय झंपर आणि काष्ट्यावर असणे, मुल झालं असलं तरी पैसे आल्यास लग्न लावणे यातून या समाजाची आर्थिक परिस्थिती जाणवते. त्यासोबतच अशा परिस्थितीही वयक्तिक स्वातंत्र्य, मुक्त विचारांची स्विकृती, माणसाला माणुस म्हणून वागवण्याची वृत्ती यामुळे या समाजाचा समजूतदारपणा आणि प्रगल्भताही जाणवते. या सर्वांचा सार काय तर, हा अनुभव मला आणखीन डोळस बनवणारा आणि माणुस म्हणून समृध्द करणारा होता हे खास.
