तुम्ही घरात नसताना अचानक तुमच्या जवळ राहणारी दहा ते बारा लोक तुमच्या घरी येऊन बसली आणि तुम्ही घरी परतल्यावर हे दृश्य बघितल्यावर तुमही काय प्रतिक्रिया द्याल? इतकचं नव्हे, तो दिवस तुमच्यासाठी विशेष असेल तर?
अगदी बरोबर. तुम्हाला ही आश्र्चर्य वाटेल की इतकी मंडळी का बरं येऊन बसली आहे. चला मग आम्ही असाच एक प्रसंग घडवून आणला तो सांगतो.
दिवस होता २५ जून २०२३, रविवार. त्या दिवशी आमच्या गावातल्या दुर्गा ताईंचा वाढदिवस होता. ताई बद्दल थोडक्यात सांगितलं तर त्या शेती करतात, त्यांचं दुकान आहे आणि उरलेल्या वेळेत शिवण काम सुद्धा करतात. ताई एका बचत गटाच्या अध्यक्ष सुद्धा आहेत.

आमच्या लिंगा आणि लाडई गाव मिळून एकूण २६ बचत गट आहेत. एका बचत गटात १० महिला आहेत. २६ बचत गट म्हटलं तर एकूण २६० महिला होतात. त्या पैकी ९० टक्के महिला शेती किंवा रोज मजुरी करतात. नोकरी करणाऱ्या माणसाला एक दिवस सुट्टी असते पण मात्र शेतकऱ्याला तसं काही नाही. तो सात ही दिवस त्याच्या ड्युटी वर जातो.
आपण मोठे झाल्यावर आपला वाढदिवस शक्यतो साजरा करत नाही आणि आपण आपल्या मुलांचा, नातवंडांचा वाढदिवस थाटात साजरा करतो. त्यांच्या सुखात आपलं सुख मानतो. महिला स्वतः साठी कमी आणि आपल्या घरातल्यांसाठी जगतात, त्यांच्यासाठी काहीना काही करण्याचा प्रयत्न करतात.
गावातल्या महिला जर एकाच शेतावर काम करत असतील तर त्यांचं भेटणं होतं, किंवा एका बचत गटात असतील तर त्यांच महिन्यांतून एकदा व्यवहार करण्याकरिता भेटणं होतं आणि काही कार्यक्रम असला तर. त्याच्या व्यतिरिक्त असं खास भेटायला जात नाही.
हे सगळं बघितल्यावर मला लक्षात आलं की आपण आपल्या मित्रांना दर दिवशी भेटतो, गप्पा मारतो, फिरायला जातो मग ह्यांची मैत्रीण कोण, ह्या कोणाशी गप्पा मारत असतील, दर दिवशी खास वेळ काढून कोणाला भेटायला जात असतील, आपलं सुख दुःख कोणाला सांगत असतील आणि मदत हवी असेल तर?
इथे जन्म झाला माझी सखी या छोट्याश्या उपक्रमाचा. आम्ही ठरवलं की सर्व बचत गटातल्या अध्यक्षांनी आपल्या महिलांची जन्म तारीख लिहून घ्यावी आणि ज्या दिवशी जिचा वाढदिवस असेल त्या दिवशी गटातल्या नऊ जणी एक वेळ ठरवतील आणि तिच्या घरी जाऊन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील.
तुम्हाला वाटेल असं का? ह्याने काय होणार? तर जसं मी आधी म्हटलं की महिला फक्त शेतात भेटतात किंवा बचत गटाचा व्यवहार करायला भेटतात इतकचं सिमित नं राहता, त्यांच्यातले संबंध वाढावे, मैत्री व्हावी आणि त्यांना आपली सखी मिळावी कारण जेव्हा वेळ पडेल तेव्हा एका हाकेवर तिच्यासाठी तिची सखी उभी असेल, जेव्हा कंटाळा आला तेव्हा तिच्या घरी जाऊन गप्पा मारेल आणि इतकचं नव्हे तर एक मेकांच्या सुखा दुःखात साथ देईल.
अशी ही सूर्वात आम्ही दुर्गा ताईंच्या वाढदिवासापासून केली आणि महिलांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. जेव्हा कुणाचा वाढदिवस असतो तेव्हा महिला शेतातून जरा लवकर येतात, घरातलं काम आटपून तिच्या घरी जातात आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.

अश्या छोट्याश्या उपक्रमांमुळे त्या महिलांना मिळणारा आनंद आणि कायमची आठवण पैष्याने विकत घेतली जाऊ शकत नाही.
