सकाळी उठायला उशीर झाला. आज काही खरं नाही. आज कदाचित ७.१२ ची ट्रेन मिळणार नाही, किंवा ९ ची बस मिळेल का ही शंका आहे, असे बरेच प्रश्न आपल्या डोक्यात येतात. प्रवास हा शब्द डोक्यात आला की कोणाला सुट्टीत फिरायला गेलेलो तो प्रवास आठवेल तर कोणाला दयनंदिन जीवनातला प्रवास.

शहरात राहणाऱ्या माणसाला ट्रेन, बस, रिक्षा, मेट्रो इत्यादी वाहतूक आठवतात तर ग्रामीण भागातल्या माणसाला विचारलं तर त्याला बस किंवा टमटम इतकचं आठवतं. शहरातल्या माणसाचं अर्ध आयुष्य प्रवासामध्ये जातं कारण जिथे तो राहतो तिथे त्याला हवी ती नोकरी मिळत नाही आणि जिथे नोकरी मिळते तिथे त्याची राहण्याची ऐपत नाही. प्रवास लांबचा असतो पण जाण्यासाठी बऱ्याच सोयी त्याचा जवळ असतात. जसं मी आधी म्हटलं की ट्रेन,बस किंवा रिक्षा आणि इतकंच नाही तर ती एक गेली की दुसरी लवकर येते आणि आपल्याला त्यासाठी जास्त वेळ थांबाव लागत नाही. आता तर नवीन सुविधा सुद्धा आल्या आहेत त्या म्हणजे उबर, ओला, रपिदो ज्या सहज मोबाइल मधलं एक बटन दाबले की वाहन तुमच्या समोर येऊन उभे राहतात. मग आता वाट बघायची पण गरज नाही.
ग्रामीण भागाच चित्र वेगळं आहे. तिथे ट्रेन आहे पण फक्त शहरामध्ये. आता मेट्रो सुद्धा चालू झाली आहे पण ती सुद्धा शहरातच फिरते. गावाकडे आलो तर आपल्याला तिथे फक्त बस किंवा टमटम ची सुविधा आहे. शहरात तुम्हाला स्टेशन वर जितकी गर्दी दिसेल तितकी इथे तुम्हाला बस देपो मध्ये दिसेल. ग्रामीण भागात इथे बरेच गाव आहेत, जी एकत्र येऊन एक तालुका होतो आणि असे अनेक तालुके एकत्र येऊन एक जिल्हा बनतो.
आता गावाकडचा प्रवास कसा आहे तो बघुया. इथे गावाकडून तालुक्याला यायला दिवसातून फक्त ३-४ बस आहेत. सकाळी एक, दुपारी दोन आणि संध्याकाळी एक. बाकीच्या वेळी टमटम असली तर पण शक्य तो ती पण नसते. इथे लोक बस मध्ये प्रवास करायचं बघतात कारण तिचं भाड कमी आहे. गावाकडून शहरात जायचं असेल तर दोन बस बदलाव्या लागतात आणि त्यांचा वेळ सुद्धा ठरलेला असतो.
एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी स्वतःच्या वाहन शिवाय दुसरी काय सोय नसते. तुम्हाला आता पर्यंत शहरातला आणि ग्रामीण भागातला प्रवास कसा असतो ते थोडा फार चित्र तुमच्या डोळ्या समोर उभं झालं असेल. आता तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो.

मी सद्या नागपूर जिल्ह्याच्या, कळमेश्वर तालुक्यात दोन गावात काम करत आहे. त्या गावचे नाव लिंगा आणि लाडई. ह्या दोन्ही गावामध्ये साधारण साडेतीन किलो मिटरचे अंतर आहे. लिंगा हे गाव जरा मोठं आहे तर लाडई हे ७५ कुटुंबाच छोटसं गाव आहे. लिंगा गाव मोठं असल्याने तिथे बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत जसं झिल्ला परिषद शाळा, माध्यमिक शाळा, शासकिय आरोग्य उपकेंद्र, आठवडा बाजार आणि बरच काही. एक वैशिष्ठ म्हणजे या दोन गावाला जोडणारा रस्ता जंगलामधून जातो. अर्थात वीस वर्षापूर्वी हा रस्ता सुद्धा नव्हता. जंगल म्हटलं तर जंगली प्राणी आपल्याला आठवतील आणि अगदी बरोबर त्यांचा तिथे वावर ही आहे. आज चांगला रस्ता आहे पण येण्या जाण्यासाठी वाहन नाही. दिवसाला फक्त ३ बस आहेत ज्या या दोन गावाला जोडतात. संध्याकाळ झाली की दोन गावामधलं येण्या जाण्याचा संबंध तुटतो.
इतकं सगळं मी बघितल्यावर लाडई गावातल्या महिलांना विचारलं की मग तुमची मुलं शिकतात कशी? तुम्हाला बरं नसेल तर डॉक्टर कडे जातात कसं? तेव्हा एक महिला म्हणाली की शिक्षण तर महत्वाचं आहे. आम्ही शिकलो नाही पण आमची मुलं शिकली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आम्ही रोज शेतात जातो आणि आमची मुलं एकटी काय शाळेत जाऊ शकत नाही म्हणून मी त्यांना माझ्या माहेरी ठेवलं आहे. गेले सहा वर्ष ते तिथेच शिक्षण घेत आहेत . तिथे शाळा ही जवळ आहे आणि त्यांची काळजी घ्यायला माझी आई सुद्धा. आणि ह्या गावात बऱ्याच महिलांनी असं पाऊल उचललं आहे. आपल्या मुलांना ते चार महिन्यांतून एकदा भेटतात. बाकी जो काही संपर्क करतो तो फोन वरून होतो.
हे सगळं ऐकल्या नंतर मी चक्क भारावून गेलो. जिथे शहरात इतक्या सोयी आहेत आणि त्यातून तुम्ही प्रवासासाठी एक निवडू शकतात, पण ग्रामीण भागामध्ये परिस्तिथी वेगळी आहे. शहरात जरी प्रवास करायला वेळ लागत असला तरी आपण रात्री आपल्या घरी येतो पण ग्रामीण भागात प्रवास इतका कठीण आहे की काही मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी गमवावा लागतं. आज लहान मुलांना जेव्हा आईचं प्रेम आणि बाबांचे लाड हवे हवे से वाटतात आणि त्याच बरोबर शिक्षण सुद्धा घ्यावंसं वाटतं तेव्हा त्यांना एक गोष्ट मिळवण्यासाठी दुसरी गोष्ट मागे ठेवावी लागते.
आता शहर आणि ग्रामीण भागातली दरी कशी कमी होऊ शकते ह्याचा आपण विचार केला पाहिजे आणि ग्रामीण भागातल्या माणसाचा प्रवास सुखाचा कसा होऊ शकतो ह्यावर उत्तर शोधल पाहिजे.
