Categories
Fellowship JSW Foundation Fellowship Marathi blogs

अंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने…

फेलोशिपच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील एका छोट्याशा आदीवासी पाड्यात जाउन काम करण्याची संधी मिळाली. हे गाव डोंगररांगामध्ये वसल्याने अतिशय दुर्गम. पालघरमधल्या जव्हार तालुक्यातील तासुपाडा नावाच्या छोट्याशा पाड्यातल्या महिला बचतगटासोबत मी काम करत आहे. त्यांच्याबरोबर यावर्षीचा महिला दिन विशेष करण्याची संधी मिळाली. दर वर्षी जागतीक महिला दिन सारी दूनिया साजरा करत असते. उच्च शिक्षणाच्या मिळालेल्या संधीमुळे जगाशी ओळख झालेली आम्ही पोरं गावाकडं असणाऱ्या आईला, बहिणींना, चुलत्यांना शेजारच्या काकुंना महिलादिनाच्या शुभेच्छा द्यायला लागलो तेव्हा कुठे हा महिला दीन त्यांच्यापर्यंत पोचला. त्यांना कळालं की असाही एक दिवस असतो. तेव्हा, जगापासून अलिप्त जंगलांमधे दरी-डोंगरामध्ये हयात घालवलेल्या महिलांना या दिनाचं महत्व कोणी सांगीतलं असेल? या प्रश्नासह या महिलांना त्यांच्यासाठीचा हा दिवस साजरा करण्याची, या दिवसाचं महत्व, महिला म्हणून त्यांच्या स्वतःच्या क्षमता त्यांच्यासमोर अधोरेखीत करण्याची संधी मिळावी या हेतूने एक अभ्यास दौरा आयोजित केला.  आम्ही महिलांना तालुक्यातील पंचायत समिती, पोलीस स्टेशन, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, उमेद कार्यालय अशा कार्यालयांना भेटी दिल्या.

अशा सरकारी कार्यालयाला भेटून अधिकाऱ्यांशी संवाद साधणे हा माझ्यासकट अनेकांचा पहिलाच अनुभव होता. “आमच्या घरचे गडी माणसं येतात हाफिसात पण, आम्ही बाया पहिल्यांदाच आलो, पंचायत समितीच्या गेटमधी पहिल्यांदाच पाउल टाकलं.”, कार्यालयात कंप्युटरवर काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे कुतूहलाने पाहून हलकंच हसत दिपा ताई म्हणाली. सरकारी लोकं आणि त्यांचं काम ती पहिल्यांदाच पाहत होती. तिथल्या टेबलावरील कागदाचे गठ्ठे पाहून “मलाबी लिव्हता वाचता आलं असतं तर… आमच्या बापानं लहानपणीच कामाला लावलं आणि १४ वर्षाची असतानाच लग्न लावलं, मग घरातून पाय काढायला वेळच नाही मिळाला”, अशी खंत मथी मायनं व्यक्त केली. पंचायत समितीत प्रवेश केल्यावर या दोघींना ऐकून पहिल्यांदा महिला दिन खऱ्या अर्थानं साजरा करत असल्याचं जाणवलं.

महिलांनी पंचायत समितीतील पशुधन संवर्धन, ग्रामपंचायत, घरकूल, आरोग्य व आदिवासी भागासाठी महत्वपुर्ण असणारा राष्ट्रीय रोजगार हमी या विभागांना भेटी देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. अधिकऱ्यांनी दिलेली माहिती महिला लक्षपुर्वक ऐकत होत्या. त्यांना पडलेला प्रश्न विचारत होत्या. त्यांचा हा सक्रिय सहभाग पाहून महिलांना संधी मिळाली तर घरचाच नाही तर आख्ख्या गावाचा कारभार त्या सांभाळू शकतात हा विश्वास माझ्या मनात दृढ होतानाचा सुंदर क्षण माझ्या स्मृतित टिपला गेलाय. पशुसंवर्धनाच्या योजनांची माहिती ऐकताना दीपा ताई म्हणाली, “याआधी आम्ही स्वतः माहिती घ्यायला आलोच नाही. सरपंच किंवा ग्रामसेवक सांगेल तेवढच. स्वतः येऊन नीट माहिती घेतली असती तर आत्तापर्यंत काय काय केलं असतं.” रोजगार हमीच्या विभागात अधिकारी आम्हाला माहिती देत होते. सगळेच लक्ष देऊन ऐकत होते. तितक्यात फुलवंती ताईंनी अचानक आवेशात रोजगार हमीच्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारला की, “आमच्याकडे तर अजून कामाचं रजिस्टरच निघालेलं नाही. आम्हाला रोजगार कसा काय मिळणार?” अधिकाऱ्यासोबत आम्ही सगळेच अचानक दचकलो. थोड्या वेळासाठी अधिकाऱ्यालाही काय बोलावं ते सुचेना. स्वतःला सावरून त्यानं जेमतेम उत्तर दिलं. फुलवंती ताईचा प्रश्न साधाच होता. पण त्यांचा नैसर्गीक आवेश त्या प्रश्नाची तिव्रता आणि त्यांच्यासाठी त्याचं महत्व अधोरेखित करत होता. आम्ही गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली. बीडीओ सरांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. बिडीओ सरांना भेटून त्यांच्या कार्यालयात सराला प्रश्न विचारता येतो ही गोष्ट महिलांच्या लक्षात आली. “आपण थेट अधिकाऱ्यांशी बोलायला घाबरतो. कसलीही भिती न बाळगता बोलल्यास त्याचा फायदा विविध योजनांची माहिती व लाभ सहजपणे मिळण्यासाठी होउ शकतो.” असे सांगून बिडीओ सरांनी महिलांना प्रेत्साहन दिले आणि मदतीचे आश्वासन दिले. महिलांचा एकूण उत्साह आणि सहभाग पाहून मन सकारात्मक झालं .

एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालय म्हणजे खास आदिवासी भागाच्या विकासासाठी काम करणारं कार्यालय. या कार्यालयाचे मुख्य अधिकारी भा.प्र.से असतात. जव्हार येथिल प्रकल्प अधिकारी आयुषी सिंह यांनी महिलांचा सत्कार करून त्यांचा दिवस खास बनवला. “याआधी कधीही महिला दिन साजराच केला नव्हता आणि आज थेट अधिकाऱ्यांकडून फुल देउन सत्कार झाला, आज खरा आमचा महिला दिन!”, असे म्हणत बेबी ताईने प्रकल्प अधिकाऱ्यांचे आभार मानले. आदिवासी लोकांसाठी कोणतीही योजना मिळवण्यासाठी जातीचा दाखला हे मुलभूत कागदपत्र आहे. आयुशी मॅडमनी महिलांना किती जणिंकडे जातीचा दाखला आहे? असे विचारले असता तीसपैकी फक्त पाचच महिलांनी हात वर केला. तेव्हा, महिलादिनाचा संकल्प म्हणून जातीचे दाखले काढून घेण्याचे आवाहन मॅडमनी केले. विशेष म्हणजे आव्हान स्विकारून २३ महिलांनी दाखले काढले सुध्दा. म्हणजे महिलांना थोडी दिशा आणि मार्गदर्शन मिळाले तर महिला स्वतःचा विकास वेगाने करून घेतील हे या छोट्याशा उदाहरणावरून स्पष्ट होते. त्यासोबतच महिलांनी पहिल्यांदाच प्रकल्प कार्यालयात फिरून विभागनिहाय कामकाज कशाप्रकारे चालतं याची माहिती घेतली. खास महिलांसाठीच्या विविध योजनांची माहिती महिलांना मिळाली. बेबी ताई म्हणाली, “इतक्या मोठ्या अधिकाऱ्याला आपण थेट जाउन प्रश्न विचारू शकतो हा आत्मविश्वास आला.” तीच्या या वाक्याने हा अभ्यास दौऱा यशस्वी झाला.  

एमएसआरएलएम म्हणजेच उमेदचे कार्यालय म्हणजे खास तालुक्यातील तायांचं हक्काचं ठिकाण. या कार्यालयामधूनच सर्व बचतगटांचे व्यवहार चालतात. बचतगट, उत्पादक गट तसेच ग्रामसंघासाठीच्या योजना तसेच रोजगार निर्मीती करून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठीचे शासनाचे विविध कार्यक्रमही या कार्यालयामार्फत राबवले जातात. हे कार्यालय जवळपास सर्वांना माहिती होते. परंतू, बचत गट केवळ पैसे जमा करणे आणि कर्ज उचलण्यासाठी नसून त्याच्या माध्यमातून महिलांना आपला छोटासा गृहउद्योग सुरू करता येतो. यासाठी कार्यरत असणाऱ्या विविध योजनांची माहिती महिलांना मिळाली. केवळ माहितीच्या आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे आपण या जगापासून अनभिज्ञ राहतो. ही माहिती जर उतरंडीतील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचली तर तोही याचा लाभ घेऊन प्रगतीच्या वाटेवर चालू शकतो.

शहरात पोलीस कसे काम करतात हे आपणास बऱ्यापैकी माहिती असते. परंतू, गावपातळीवर पोलीस यंत्रणा कशी काम करते? महिलांसाठी पोलीसांचे काही विशेष कार्यक्रम असतात का? ग्रामिण भागात पोलीस म्हटलं की लगेच एक भिती बसलेली असते. कशाला पोलीसांची झंझट म्हणून गाव पातळीवरही महिला अनेक अत्याचार निमुटपणे सहन करतात. तेव्हा, महिला दिनाच्या निमित्ताने याही विषयाबद्दलही माहिती घेण्यासाठी आम्ही जव्हार ग्रामिण पोलीस ठाण्याला भेट दिली. तेथील सहायक पोलीस निरिक्षक सरांनी महिलांशी संवाद साधला. “आज तुमच्यामुळं पोलीस ठेशनची पायरी चढली बघा. ज्यांची भिती वाटत असते त्यांच्याशी आज हसून गप्पा मारल्या” असं लच्छी ताई हसत म्हणाली. जवळपास सर्वांनीच पहिल्यांदा पोलीस स्टेशन आतून फिरून पाहिलं. पहिल्यांदाच बंदूक हातात घेतली. कोठडी पाहून फुलवंती ताई म्हणाली, “एकदम पिच्चरमधल्यासारखच जेल हाय ही तर.” अशी पोलीस स्टेशनची इंटरेस्टींग भेट संपवून आम्ही आमच्या पहिल्या महिला दिनाचा समारोप केला.

“जेव्हा कळालं की असा महिला दिन असतो आणि आपल्याला जव्हारला जायचंय, तेव्हा मनात वाटलं की महिलांचा पण दिवस असतो काय़? बायांना काय माहिती देणार अधिकारी लोकं. पण सगळे एकत्र आल्यानं सगळ्यानी किती छान माहिती दिली. एकजूटीचं महत्व!”,जाता जाता मथी माय बोलून गेली.

 पुरूषप्रधान समाजव्यवस्था असलेला हा आपला भारत. भारतात इंदिरा गांधीं पासून द्रौपदी मुरमूंपर्यंत यशस्वी महिलांची उदाहरणे आपण रोजच ऐकत असतो. परंतू, याच देशातील खेड्यांमध्ये आजही एका महिलेला घरातून बाहेर निघण्यासाठीही नवऱ्याची, सासऱ्याची किंवा घरातील गडी माणसाची परवानगी घ्यावी लागते. आज एका बाजूला आपण मुलींना उच्च शिक्षण देऊन यशस्वी करण्याचे स्वप्न पाहणारे पालक पाहतो. तर, दुसऱीकडे दहावी बारावी झाली की मुलीचं लग्न उरकून टाकणारा, मुलीला शिकवून काय फायदा म्हणनारा ही समाज आहे. अशी ही विषमता शहरी चश्मे घालून जग पाहणाऱ्यांना फारशी जाणवणार नाही. कारण विकासाची गंगा ही काळाच्या ओघात शहरांमध्ये पोचली असेल. परंतू, अजूनही या गंगेचा प्रवाह शहरांपासून दूर असणाऱ्या खेड्यांना स्पर्श करण्यास असमर्थ ठरला आहे. त्यामुळे इथल्या जनतेपर्यंत ७५ वर्षांचं हे म्हातारं स्वातंत्र्य अजून पोचलंच नाही. प्रचंड कष्टाला इथल्या लोकांकडे पर्य़ायच नाही. हेच कारण असावं की पुरूषांसोबत महिलाही तितक्याच किंवा अधिक क्षमतेने शेती, मजूरी आणि घरातील कामेसुध्दा करतात. इथल्या महिलांना पाहून महिला पुरूषांपेक्षा कमी नसून अधिक सामर्थ्यवान असतात याचा प्रत्यय क्षणोक्षणी येतो.

Leave a comment